
चाकण :
खेड तालुक्यातील आसखेड येथे एका ४४ वर्षीय व्यक्तीचा खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह ओढ्यात नेऊन डोक्यात मोठा दगड घालण्यात आला. पोलिसांनी काही तांत्रिक तपासाच्या आधारे खून झालेल्या व्यक्तीच्या मेहुण्यासह दोघांना अटक केली आहे. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशयातून मेहुण्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अर्जुन गबाजी कावडे ( वय ४४ वर्षे सध्या रा.सगर कुटी संघ, ७ बंगला, अंधेरी वेस्ट, मुंबई, मुळ रा.कोळीये ता.खेड जि .पुणे ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्जुनचा मेव्हणा गणेश धनाजी काळुंखे ( वय 40 वर्षे रा. मुंबई ) त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे ( वय ३० वर्षे रा.मालवणी मुंबई ) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी 13 फेब्रुवारी 2025 रोजी आसखेड खुर्द ( ता.खेड ) गावच्या हददीतील चाकण वांद्रा रोडपासून कॅनॉल नजिक ओढयामध्ये अर्जुन कावडे याचा मृतदेह मिळून आला होता. कावडे यास मारहाण करुन त्यास ओढयामध्ये नेवून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचे चेह-यावर मोठा दगड घालून त्यांचा खुन करण्यात आला होता. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ३ यांच्याकडून सुरु होता.
गुन्हे शाखेचे एक तपास पथक मुंबई येथे तपासकामी पाठवून व दुसरे तपास पथकाने खून झालेल्या अर्जुन याच्या गावामध्ये चौकशी करुन तपास केला. मुंबई येथे मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासुन सदर मृत्यू झालेल्या अर्जुनचा मेव्हणा गणेश काळुंखे याच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. खून झालेल्या अर्जुन कावडे याचे संशयित आरोपी मेहुणा गणेश काळुंखे याचे पत्नी सोबत अनैतिक संबंध होते. त्याच संबधातुन खुन केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ३ यांच्याकडून देण्यात आली आहे. सदर गुन्हयात आरोपी गणेश काळुंखे यास मदत करणारा त्याचा मावस भाऊ विकास शांताराम मोदळे ( वय 30 वर्षे रा.मालवणी मुंबई ) यास देखील गुन्हे शाखा युनिट 3 व महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मुंबई येथून संयुक्तरित्या ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.