भिवंडीतील घटनेनं खळबळ! आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून दगडफेक, एक पोलीस जखमी

Photo of author

By Sandhya


ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी येथे आरोपींना शोधण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी गेलं असता, तेथील स्थानिकांनी पोलिसांसह वाहनावर दगडाने हल्ला केला. यात पोलिसांच्या वाहनाचं नुकसान झालं असून या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची धरपकड सुरू केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

भिवंडी शहरातील वऱ्हाळ, देवीनगर आणि कामतघर झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या काही जणांनी याच परिसरात राहणाऱ्या कुटुंबावर हल्ला केला होता. प्रेम प्रकरणातून आरोपींनी एका अल्पवयीन मुलीसह तिच्या आई वडिलांना मारहाण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीनं फिनेल प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी पीडित मुलीला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलं. पीडितेला रुग्णालयात दाखल केल्यानं याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नारपोली पोलीस रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून घेतला. पीडितेनं दिलेल्या तक्रारीवरून उमेश गायकवाड, सचिन साठे, कृष्ण मंडल, नवीन उर्फ चिंट्या, शुभम परुळेकर, उमा वाघमारे, पंकज कांबळे यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. यावेळी संबंधित आरोपी वऱ्हाळ देवीनगर झोपडपट्टीत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, सुनील शिंदे आणि तडवी हे तिघे पोलीस व्हॅन घेऊन आरोपींना पकडण्यासाठी गेले. पण यावेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पोलीस पथकाला घेरलं आणि अरेरावी करायला सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ करत पोलिसांना धक्काबुक्की केली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी पोलिसांसह पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत तडवी हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात पोलीसांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच अशाप्रकारे हल्ला झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Leave a Comment