“जाती विसरू तेव्हा मोठे होऊ” – इस्लामपूरमध्ये नाना पाटेकर यांचा संदेश

Photo of author

By Sandhya



सांगली : “तुमची प्रज्ञा, ताकद आणि वैचारिकता यावर तुमचे मोठेपण अवलंबून आहे. मला आजवर कुणी जात विचारली नाही. संतांनी ब्राह्मणांची मिरासदारी मोडून काढली. आपण जाती विसरू तेव्हा मोठे होऊ. काम करताना चेहरा महत्त्वाचा नसतो, आपण काय करतो ते महत्त्वाचे असते. मेंदूत ताकद आणि विचारधारा भक्कम असावी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. इस्लामपूर येथे आयबीएफच्यावतीने आयोजित व्यावसायिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रतीक पाटील, आयबीएफचे अध्यक्ष विकास राजमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाटेकर म्हणाले, “जयंत पाटील यांनी नियतीने लादलेले राजकारण यशस्वी करून दाखवले आहे. कोणाला त्रास न देता आनंद मिळवणे हे छान आहे. ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून एक हजार गावांमध्ये काम सुरू आहे. पूर्वी दुष्काळी असलेली गावे आता बागायती घोषित झाल्याचा आनंद आहे. खरं बोललं की लक्षात ठेवावं लागत नाही, मात्र त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागते.” या कार्यक्रमाला राजवर्धनभैया पाटील, शामराव पाटील, विश्वतेज देशमुख, आर.डी. सावंत, धैर्यशील पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज चौगुले यांनी केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page