
नारायणगाव : पुणे नाशिक महामार्गावरून शिंगवे पारगाव येथील रहिवासी असणारे योगेश वाव्हळ व संतोष कोल्हे हे चारचाकी गाडीने मंचरच्या दिशेने निघाले होते. तसेच त्यांच्यापुढे 50 ते 60 फूट अंतरावर दोन ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टरही मंचरच्या दिशेने ऊस घेऊन निघाला होता .प्रत्येक ट्रॉलीत १० टन ऊस होता .दरम्यान गुरुवार (दि .२७ ) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नारायणवाडी बाह्यवळण रस्त्यावर या ट्रॅक्टर ट्रॉलींना जोडणारा सुकाणू तुटला .व ही ऊसाने भरलेली ट्रॉली उलट मागच्या दिशेने येऊन वाव्हळ व कोल्हे यांच्या चारचाकी गाडीवर पलटी होऊन अपघात झाला.सुदैवाने या अपघातात वाव्हळ व कोल्हे यांचा जीव वाचला.स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले . ही घटना नारायणगाव पोलीस स्टेशनला कळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.या घटनेमुळे ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
सध्या ऊस तोडणी हंगाम सुरु आहे .त्यामुळे पुणे –नाशिक महामार्गावरून धोकादायक पद्धतीने दोन ट्रॉलीमध्ये ऊसाची वाहतूक केली जाते .ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून धोकादायक पद्धतीने अल्पवयीन मुले ट्रॅक्टर चालवीत असतात .तसेच ट्रॅक्टर नादुरुस्त झाल्यानंतर रस्त्यावरच उभे केले जातात .यामुळे अशा अपघातांना निमंत्रण दिले जात आहे
दोन ट्रॉलीद्वारे होणारी ओव्हरलोड ऊस वाहतूक बेकायदेशीर आहे .याकडे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करीत आहेत .भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी पोलिसांनी ट्रॅक्टर ला जोडलेल्या दोन ट्रॉलीद्वारे होणारी ऊस वाहतूक बंद करावी