
मुंबई : नागपुरच्या भालदारपुरा परिसरात हिंसाचार झाला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण बघायला मिळाले. या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारीही जखमी झाले. जमावाकडून पोलिसांना टार्गेट करण्यात आले. हेच नाही तर एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्नही जमावाकडून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. महिला कर्मचाऱ्यांसोबत जमावाकडून चुकीचे वर्तन करण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत अनेक जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कडक पाऊले उचलण्याचे आदेश दिले.
नागपुरच्या हिंसाचाराबद्दल बोलताना नुकताच गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, तपासामध्ये आणि व्हिडीओ रेकार्डिंगमध्ये ज्या गोष्टी पुढे येत आहेत त्या अतिशय गंभीर आहेत. त्याचे गांर्भिय लक्षात घेता जे कोण दोषी आहेत. त्या सगळ्यांवरती कठोर कारवाई केली जाईल. दोषींना अजिबात सोडले जाणार नाही. पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत होत असेल पोलिसांचा धाक हा नक्कीच दाखवला जाईल. योग्य कायद्याने कारवाई केली जाईल.
घरावरून आणि छतावरून दगडांचा वर्षाव होत असेल तर ही फार जास्त गंभीर बाब आहे. काही गोष्टी अशा आहेत, ज्या पुढे येत आहेत त्याच दिवशी काही ठरावीत लोकांच्या गाड्या तिथे पार्क नसणे, काही ठराविक दुकाने बंद असणे, काही ठराविक घरांमध्ये लोक नसणे. यामुळे हा एक पुर्वनियोजित कट दिसतोय. यामुळेच या विषयाचे गांर्भिय लक्षात घेता तपासामध्ये अनेक गोष्टी पुढे येतील. आतापर्यंत जी माहिती आहे, त्यानुसार आपण कारवाई करत आहोत.
पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले की, याचा सूत्रधार कोण याचा शोध घेत आहोत. सोशल मीडियावर जर या हिंसाचाराचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतील तरीही आम्ही कारवाई करणार आहोत. सूत्रधाराला लवकरच ताब्यात घेतले जाईल, असेही योगेश कदम यांनी स्पष्ट केले. या हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. या पोलिसांची सध्याची स्थिती बघितली तर हा हिंसाचार किती जास्त भयंकर होता, हे पुढे येतंय.