
सातारा: मागील काही काळापासून राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेनं मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला आहे. ज्या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
सातारा पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता मोठी कारवाई करत महिलेला अटक केली आहे. संबंधित महिलेनं हे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटींची मागणी केली होती. यातील एक कोटींची रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
संबंधित महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात देखील गाजला. आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला असून आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झालीय. सातारा गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. एक कोटींची रक्कम स्विकारताना ही अटक केल्याचं सांगितलं जातंय. सातारा शहर पोलीस ठाण्यात अटकेची पुढील कार्यवाही सुरू आहे.