
पुणे : हिंजवडी येथील व्योम ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला मोठी आग लागल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर झालेला खुलासा सर्वांनाच धक्का देणारा होता. सुरूवातीला हा अपघात असल्याचे सर्वांनाच वाटले. मात्र, हा अपघात नाही तर घातपात होता. पोलिस चाैकशीत हैराण करणारी माहिती पुढे आली. टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक जनार्दन हंबर्डीकरनेच हा सर्व आगीचा कट रचला. सीट खाली आग लावून त्याने बसमधून उडी मारली. या आगीच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण गंभीर जखमी आहेत.
जनार्दन हंबर्डीकर याने आगीचा संपूर्ण कट हा अगोदरच रचला होता. तो चिंध्या आणि काडीपेटीसोबत घेऊन आला होता. आता अजून एक धक्कादायक माहिती ही पुढे आलीये. जनार्दन हंबर्डीकर यांच्याबद्दल माहिती सांगताना एका कर्मचाऱ्याने सांगितले की, जनार्दन हा वेगळ्या स्वभावाचा होता, त्यांचा स्वभाव विचित्र होता. तो छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालत. हेच नाही तर घटनेच्या एक दिवस अगोदर नेमके काय घडले होते हे देखील या कर्मचाऱ्याने सांगितले.
त्यांनी सांगितले की, घटनेच्या एक दिवस अगोदर मी बाहेर उभा होतो, त्यावेळी जनार्दन हंबर्डीकर हे सर्वजण लयभारी झाले आहेत, यांच्याकडे बघतोच आता. वाट लावतो एकेकाची म्हणत होता. म्हणजेच काय तर जनार्दन हंबर्डीकर यांच्या डोक्यात अगोदरच राग होता आणि त्यानुसार त्याने हा कट रचला. ज्या बसला आग लावली त्याच बसमधून विठ्ठल गेनू दिघे हे देखील प्रवास करत होते. बसमध्ये नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
बसमध्ये आग लावण्याच्या अगोदर जनार्दन हंबर्डीकरने बस थांबवली होती. त्याने सीटखाली काहीतरी केले आणि बस सुरू करत लगेचच थोड्यावेळाने बसमधून पळ काढला. बसच्या आगीची संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचेही बघायला मिळाले. सीसीटीव्हीमध्ये जनार्दन हंबर्डीकर हा आग लागण्याच्या अगोदर बसमधून उडी मारताना दिसला. जनार्दन हंबर्डीकर याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.