
DCM Eknath Shinde : विनोदी कलाकार कुणाल कामराने एका शोमध्ये सादर केलेल्या विडंबनगीताने महाराष्ट्रात नवा वाद उद्भवला आहे. या गीताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली, तर मुंबई महापालिकेनेही योग्य मुहूर्त साधत हॉटेल आणि स्टुडिओच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणावर काल दिवसभरात सर्वांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. पण खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. अखेर त्यांनी याप्रकरणी पहिलं भाष्य केलं आहे. ते बीबीसी मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
कुणाल कामराने विडंबन गाण्यातून केलेल्या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं होतं. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आरोपांवर उत्तर देत नाही. मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. त्याचा फायदा आरोप करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आणि काम करणाऱ्यांना लोकांनी सत्ता दिली.
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे
“अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरअर्थ आणि गैरफायदा घेण्यात आला. मी विडंबन समजू शकतो. विडंबन अनेक कवी करायचे. पण हे व्यभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम आहे. माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं. मी यासंदर्भात कोणालाही प्रतिक्रिया दिली नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना असतात. पण याच माणसाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्याबाबत काय म्हटलंय बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय म्हटलंय, लाडकी बहीण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविषयी काय म्हटलंय बघा, पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याबरोबर भांडला त्यामुळे त्याला दोन तीन एअरलाईन्समध्ये बाहेर केलंय. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीय. हे कोणाची सुपारी घेऊन आरोप केलेले आहेत, त्यामुळे मी काही रिॲक्ट झालो नाही”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मी कामातून उत्तर देणारा माणूस
“मी याविषयावर बोललोच नाही. मी बोलणारच नाही. मी काम करणारा माणूस आहे. मी संवेदनशील आहे, माझ्यात सहन करण्याची ताकद आहे. मी कधीही कोणावरही रिॲक्ट होत नाही, मी शांत राहणं, आपलं काम करणं, आपला फोकस कामावर केंद्रित करणं आणि लोकांना न्याय देणं योग्य मानतो. हे केल्याने देदीप्यमान यश आपण पाहतोय”, असंही ते म्हणाले.