
बीड : बीडमधील कराड आणि गिते यांच्यातील टोळीयुद्धाच्या छुप्या कहाण्या बीडमध्ये दबक्या आवाजात चर्चिल्या जायच्या. परंतु सोमवारी सकाळी बीडच्या तुरुंगात गितेच्या समर्थक कैद्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना चोप दिल्याचे वृत्त आल्यानंतर पुन्हा एकदा दोहोंमधील टोळीयुद्धाची नव्याने चर्चा होऊ लागली.
बीड जिल्हा तसा मागास, पाण्याचे दुर्भिक्ष्य… त्यामुळे कोणत्याही प्रकारचे औद्योगिकरण झालेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. परंतु राजकारण्यांच्या नादी लागून खोटी प्रतिष्ठा आणि पैशाच्या हव्यासातून अनेक टोळ्या एकमेकांच्या जीवावर उठल्या आहेत. त्यातील एक टोळी म्हणजे बबन गिते आणि वाल्मिक कराड. कधी खून कधी अपहरण कधी खंडणी अशा या ना त्या कारणाने दोघेही चर्चेत असायचे. परंतु सत्तेच्या वर्तुळात आपापली माणसे असल्याने गुन्हे दाखल करतानाच सोयीस्कररित्या केले जायचे. मात्र देशमुख हत्येनंतर बीडची दुसरी बाजू महाराष्ट्रासमोर आली आणि बीडच्या टोळीयुद्धाचे क्रौर्य आणि अनेक काळे कारनामे समोर आले.
बबन गिते याचा परळीच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. त्याची पत्नी परळीच्या पंचायत समितीची सदस्य आहे, त्याआधी तिने सभापतीपदही भूषवले आहे. परळी शहरातील सामाजिक कामांमुळे त्याला मोठा पाठिंबाही मिळाला. वंजारी समाजातून येत असल्याने त्याला समाजाचाही मोठा पाठिंबा मिळाला. गिते गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात तयार झाला. त्याने पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्याासाठी काम केले. त्याचे धनंजय मुंडे यांच्याशीही चांगले संबंध होते. परंतु काही मतभेदांमुळे त्याने दोघांसाठीही काम करणे सोडून दिले. धनंजय मुंडे यांच्याविरोधातील राजकारणामुळे अल्पावधीत गिते जिल्ह्यात लोकप्रिय झाला. दुसरीकडे वाल्मिक कराड याला धनंजय मुंडे यांचा आश्रय होता. कराडही परळी नगरपालिकेवर नगरसेवक होता. दोघांमध्ये अनेक कारणांवरून वाद होते. एकमेकांचे अस्तिस्व मिटविण्यापर्यंत दोघेही टोकाला गेले होते.
वाल्मिक कराड तसा देवभोळा, अगदी धार्मिक माणूस… आठवड्या-पंधरा दिवसाला कुठल्या तरी देवस्थानाच्या दर्शनाला जायचा. तो पायात चप्पल घालत नव्हता. कदाचित देवाचा नवस वगैरे असल्याने तो पायात चप्पल घालत नाही, असा अनेकांचा समज होता. परंतु जोवर बबन गितेला संपविणार नाही तोवर पायात चप्पल घालणार नाही, असा प्रण त्याने केला होता. याउलट जोवर वाल्मिक कराडला संपविणार नाही, तोवर दाढी काढणार नाही, असा निर्धार बबन गितेने केला होता, असे अगदी स्पष्टपणे भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना सांगितले. आजवर दोघांबद्दलच्या संघर्षाची दबक्या आवाजात होणारी चर्चा सुरेश धस यांच्या जाहीर वक्तव्याने आज खुलेपणाने झाली.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बबन गिते यांच्याकडे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून पाहिले जाऊ लागले. त्यांनीही मोठे शक्तिप्रदर्शन करीत विधानसेच्या आधी काही महिने राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान, सरपंच बापू आंधळे यांच्या खून प्रकरणात कराड याच्या सांगण्यावरून बबन गिते याच्यावर आरोप ठेवून गुन्हे दाखल करण्यात आवे, असा दावा गिते समर्थक करतात. यादरम्यानच कराड-गिते यांच्यातील संघर्ष अधिक बळावल्याचे सांगण्यात येते.