डोंबिवलीत भररस्त्यात हवेत गोळीबार; शेतकऱ्याला ठार मारण्याची धमकी

Photo of author

By Sandhya


डोंबिवली : डोंबिवली जवळील भोपर गावातील एका ४३ वर्षाच्या शेतकऱ्याला किरकोळ कारणावरून मारहाण करण्यात आली. गावातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत गावातील एका ग्रामस्थाने शेतकऱ्याला मारहाण केली. त्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने ग्रामस्थाने घरातून वडिलांची बंदूक आणून त्याला मारून टाकण्याची धमकी देत बंदुकीतून हवेत गोळीबार केला. या गोळीबार प्रकरणी भोपर गावातील शेतकरी महेंद्र पाटील (४३) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भोपर गावातील रहिवासी योगेश मढवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात म्हटलं आहे, की शनिवारी हुनमान जयंती होती. भोपर गावातील हनुमान मंदिरात जयंतीनिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. या पालखी सोहळ्यात ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते. या मिरवणुकीत शेतकरीही इतरांप्रमाणे नाचत होतो. यावेळी योगेश मढवी यांनी आपल्याला पाठीमागून जोराचा धक्का दिला आणि त्याने त्याच्या कडील गळ्यातील साखळी काढून जोरात शेतकऱ्याच्या पाठीत मारली. त्यावेळी गावात देवाचा उत्सव असल्याने शेतकऱ्याने या प्रकरणाबाबत कोणाला काहीही सांगितलं नाही.

या घटनेनंतर शेतकरी महेंद्र पाटील हनुमान मंदिरात दुसऱ्या दिवशी सकाळी देवदर्शनासाठी जात होते. त्यावेळी योगेश मढवी यांनी शेतकरी महेंद्र यांना पुन्हा आवाज देऊन थांबवले आणि ‘काय रे तुला रात्रीचा मार कमी पडला आहे का,’ असा प्रश्न केला. यावेळी या मारहाण प्रकरणामुळे त्रस्त महेंद्र पाटील यांनी योगेश यांना ‘दादा तुम्ही मला निष्कारण का त्रास देत आहात. मी तुम्हाला काही केले नसताना तुम्ही मला असेच त्रास देत असाल तर मी आत्महत्या करतो,’ असे उद्विग्न अवस्थेत बोलले.

यावेळी योगेश मढवी यांनी महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘अरे तु कशाला आत्महत्या करतोस. मीच तुला ठार मारतो थांब.’ असे बोलून योगेश मढवी आपल्या घरी गेला. त्यांनी वडिलांची बंदूक सार्वजनिक ठिकाणी आपण उभा होतो त्या ठिकाणी आणली. आपल्याला पाहून योगेश यांनी बंदुकीतून हवेत गोळीबार केला. महेंद्र पाटील यांना उद्देशून ‘आता तुम्हाला मारूनच टाकतो,’ अशी धमकी दिली. महेंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत हा सर्व तपशील दिला आहे.

दरम्यान या गोळीबार घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि या प्रकरणाचा तपास करून तर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२) आणि शस्त्र अधिनियम, १९५९ कलम ३, २५, २७ प्रमाणे योगेश मढवीविरोधात गुन्हा दाखल केला असून याप्रकरणात योगेश मढवी याची चौकशी सुरू असून अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page