
दहावी-बारावीचे निकाल लागूनही उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले विविध दाखले वेळेत मिळत नसल्याने पुरंदर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांनी सेतू केंद्रे व ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मध्ये अर्ज केले आहेत, परंतु ऑनलाइन सेवांमधील अडचणींमुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे
परिंचे येथील नागरी सुविधा केंद्रावरील ७०-८० अर्ज अजूनही प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत. वेळेत दाखले न मिळाल्यास प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. या गंभीर समस्येकडे पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीने लक्ष वेधले आहे. तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन देऊन शैक्षणिक कारणास्तव दिले जाणारे दाखले प्राधान्याने वितरीत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे.
यावेळी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन महाजन, निरा मार्केट कमिटीचे माजी संचालक संभाजी काळाणे, सासवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार जगताप, माजी नगरसेवक नंदकुमार जगताप, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मोबीन बागवान उपस्थित होते.