उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

Photo of author

By Sandhya

बारामती, दि.२९: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची तसेच नीरा डावा कालवा दुरुस्तीच्या कामांची पाहणी करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.

यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्यात अवकाळी पावसामुळे शेती, पिके, पशुधन, घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात येत आहे. तसेच बाधित नागरिकांना अन्नधान्यही पुरविण्यात येत आहे, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यात येईल.

नीरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची तात्काळ कामे सुरु करावी. कालव्यामधील संपूर्ण राडारोडा काढून घ्यावा. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्याकरीता कालव्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रत्याच्या कडेला पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइड पट्टी भरुन घ्याव्यात, असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी श्री. पवार यांनी रस्ता, पूल, कोसळलेली घरे आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Leave a Comment

You cannot copy content of this page