जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

Photo of author

By Sandhya


 
 पुणे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गजानन पाटील यांच्या हस्ते इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्या हस्ते पादुकांचे पाद्य पूजन करून आरती झाली. यावेळी पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, देहू नगर पंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव मोरे, ह.भ.प दिलीप मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश मोरे, ह.भ.प. लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते.
 दर्शन व पूजेनंतर मान्यवरांचा मंदिर संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. महापुजेनंतर पालखीचे इनामदार वाड्यातून प्रस्थान झाले.देहू नगरीत सकाळपासूनच पावसाचा जोर होता. वारकऱ्यांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी….  ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणाने देहू नगरी भारून गेल्याचा अनुभव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्यास मिळत होता. पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी देहू नगरीत दाखल झाले होते. इनामदार वाड्यातून पालखीच्या प्रस्थानापूर्वीच वारकऱ्यांचे आकुर्डी मुक्कामाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होते. 

Leave a Comment

You cannot copy content of this page