


खराडी येथील मुळा-मुठा नदीवरील बंधाऱ्यावर आज एक मोठा अपघात टळला. वाढलेल्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह वाढलेला असतानाच, एका इसमाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, खराडी पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखवलेले शौर्य आणि तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी पोलिसांना मुळा-मुठा नदीवरील पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सहायक पोलीस निरीक्षक (सपोनि) खांडेकर आणि त्यांच्या पथकाने खराडीहून केशवनगरकडे जाणाऱ्या पुलावरील रस्ता बंद करण्यासाठी तातडीने धाव घेतली. त्याचवेळी एक इसम मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकल्याचे निदर्शनास आले.पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाढत असताना, सदर व्यक्ती वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती. फायर ब्रिगेडला सूचना देण्यात आली, पण वेळ न गमावता, पोलिसांनी स्वतःची जीवितहानी न पाहता धाडसी निर्णय घेतला.
सपोनि खांडेकर, अंमलदार दोरगे, हवालदार सय्यद, अंमलदार गायकवाड, महिला अंमलदार थोरात, मालवंडे, साळके आणि कोद्रे यांनी दोरीच्या साहाय्याने मानवी साखळी तयार करून त्या अडकलेल्या इसमाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
प्राण वाचवलेल्या व्यक्तीचे नाव नवाज खुर्शीद कोतवाल (वय ३८, रा. तुकाराम नगर, चंदन नगर, पुणे) असे आहे.यावेळी पोलिसांनी तत्काळ निर्णय घेत रस्ता पूर्णपणे बॅरिकेट्स लावून बंद केला असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपूर्ण घटनेत पोलिसांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.