पानशेत येथील युवकाच्या खुनाचा अवघ्या २४ तासांत छडा, पाच आरोपींना अटक

Photo of author

By Sandhya

पानशेत (ता. वेल्हे) येथे फिरण्यासाठी आलेल्या पाच पर्यटक युवकांनी किरकोळ वादावरून स्थानिक युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना १५ जून रोजी घडली. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत सर्व आरोपींना अटक केली आहे. वेल्हा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), ३(५), १८९(२), १९१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खूनाची घटना

पानशेत धरण परिसरात फिरण्यासाठी आलेले अनोळखी पाच युवक नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेलसमोर सिगारेट पित असताना, रोहीदास काळूराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता. वेल्हे) याने त्यांना हटकल्याचे कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन रोहीदासला छातीवर दगड मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी हे काळ्या रंगाच्या अ‍ॅक्टीव्हा (एमएच १२ केएच ९६४२) व स्प्लेंडर दुचाकीवरून घटनास्थळावरून फरार झाले होते.

पोलिसांचा शिताफीने तपास

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी सुनीलकुमार पुजारी, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही तपासाद्वारे आरोपींच्या वाहनांची माहिती मिळवली गेली. तपासाअंती काळ्या अ‍ॅक्टीव्हा क्रमांक एमएच १२ केएच ९६४२ ही नन्हे परिसरात आढळून आली.

आरोपींची अटक

अ‍ॅक्टीव्हाचे मूळ मालक गणेश नवघरे यांच्या चौकशीतून ही गाडी आकाश सुभाष भिसे (वय २१, रा. वाल्हेकर चौक, पुणे) याच्याकडे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या साथीदारांमध्ये भागवत आसुरी (वय २०), रितेश जोगदंड (वय २१), उमेश ऊर्फ भैय्या शेळके (वय २१) आणि पांडूरंग सोनवणे (वय १९) यांचा समावेश होता. हे सर्व आरोपी परभणी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

यशस्वी कारवाई

या गुन्ह्याचा यशस्वी तपास व कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने पार पाडली. या कारवाईमध्ये सपोनि नितीन खामगळ, सपोनि राहुल गावडे, पो.अं. सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, अतुल डेरे, वेल्हा स्टेशनचे पोसई अमित देशमुख आणि अन्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page