माऊलींचा पालखी सोहळा सोपानकाकांच्या सासवडनगरीत विसावला; लाखो वैष्णवांचा मेळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी

Photo of author

By Sandhya

सासवड- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढवारीसाठी निघालेला पालखी सोहळा आज, रविवार (दि. २२) रोजी पुण्यापासूनचा सर्वात लांबचा पल्ला (३२ कि.मी.) आणि अवघड दिवे घाटाची चढण यशस्वीरित्या चढून माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या सासवड नगरीत दाखल झाला. लाखो वैष्णवजनांसह माऊलींचा पालखी सोहळा सासवड येथील प्रशस्त पालखी तळावर रात्री १० . २० वाजता दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला.
ज्ञानोबा माऊली तुकाराम! गजराने दुमदुमले सासवड पालखी तळावर सोहळा दाखल होताच, वारकऱ्यांनी नेत्रदीपक रिंगण केले. मानाच्या २७ दिंड्यांच्या अभंगाचा आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पालखी तळावर आल्यानंतर चोपदारांनी दंड उंचवताच सर्वत्र शांतता पसरली. हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंची माहिती देण्यात आली, तसेच मंगळवारी (दि. २४) सकाळी ७ वाजता पालखी सोहळा मार्गस्थ होणार असल्याची घोषणा चोपदारांनी केली. त्यानंतर पुन्हा माऊलींच्या नावाचा गजर झाला आणि समाज आरती पार पडली. यानंतर वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले.
पालखी सोहळ्याचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.माऊलींचा पालखी सोहळा सासवड हद्दीत दाखल होताना चंदन टेकडीजवळ सासवड नगरपालिकेच्या वतीने दिमाखदार स्वागत करण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिंडी प्रमुखास श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर हा सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळाकडे जाताना सोपाननगर कमानीजवळ सनदी अधिकारी राजेंद्र जगताप, माजी आमदार संजय जगताप यांच्यासह संत सोपानकाका सहकारी बँकेच्या संचालकांनी सोहळ्यातील दिंडीप्रमुख, विणेकरी आणि माऊलींच्या पालखी रथाचे स्वागत केले. पालखी तळावर माजी आमदार संजय जगताप उपस्थित होते. 
मोबाईल सेवा विस्कळीत, तरी उत्साह कायम होता
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरातील मोबाईल आणि इंटरनेट सुविधेत कमालीचा विस्कळीतपणा आला होता. तरीही वारकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता जाणवली नाही. पालखी तळावर पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्त तैनात होता, ज्यामुळे सोहळा सुरळीत पार पडला. यंदाच्या सोहळ्यात तरुणांचा मोठा उत्साह दिसला असून, वारकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. माऊलींचा पालखी सोहळा दि. २२ व २३ जून असे दोन दिवस सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page