
पुणे -पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात दाखल झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या काही वारकऱ्यांवर अज्ञात व्यक्तींनी मांस फेकल्याची तक्रार समोर आली आहे. या कृत्यामुळे वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून, समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस तपास सुरू असून, संबंधितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
या घटनेवर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. वारकरी संप्रदायाचे संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या भावना दुखावणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
दरम्यान, या घटनेमुळे वारकरी आणि भाविक वर्गात संतापाचे वातावरण असून, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.