संत सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे नीरा नगरीत भक्तिमय स्वागत; गुरुवारी पहिले गोल रिंगण

Photo of author

By Sandhya

संत सोपानकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवार दुपारी पुरंदर तालुक्यातील शेवटचा मुक्काम पूर्ण करून नीरा नगरीत आगमन झाले. आहिल्यादेवी होळकर चौकात पालखी रथातून उतरवून, उत्साही भाविकांनी खांद्यावर घेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नेली. या वेळी संपूर्ण नीरा नगरी भक्तिरसात न्हालेली दिसून आली.
या अगोदर सकाळी पालखीने मांडकी गावाचा मुक्काम आटपून जेऊर मार्गे पिंपरे (खुर्द) येथे न्याहारीसाठी थांब घेतला. जेऊर येथे सकाळी सातच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. पिंपरे गावच्या हद्दीत पालखी मार्गक्रमण करत असताना आकाशातून पावसाच्या हलक्या सरी आल्या, ज्यामुळे वातावरण आणखीनच अल्हाददायक झाले.
नीरेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी साडेबाराच्या सुमारास पालखी रथाचे आगमन झाले. पायी चालत आलेले वारकरी यावेळी थकलेले दिसत होते, मात्र गावकऱ्यांच्या प्रेमळ स्वागताने आणि वातावरणातील भक्तीभावाने त्यांचा थकवा क्षणात दूर झाला. गावाच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विराज काकडे, ग्रामपंचायत सदस्य अभिषेक भालेराव, डॉ. वसंत दगडे, अनंता शिंदे, सुनील चव्हाण, बाळासाहेब भोसले, विजय शिंदे आदी मान्यवरांसह ग्रामसेवक, तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आहिल्याबाई होळकर चौकात रथातून पालखी खांद्यावर घेऊन विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. दुपारच्या या विसाव्याच्या काळात परिसरातील नागरिकांनी रांगांमध्ये उभे राहून सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. या ठिकाणी दरवर्षी होणाऱ्या पालखी मुक्कामात दिंड्यांची संख्या वाढताना दिसते. यावर्षी दिंड्यांची संख्या ८ ने वाढून एकूण ११५ दिंड्या सहभागी झाल्या असून, रथा पुढे ३० आणि रथा मागे ८५ अशा रचनेत अंदाजे १ लाख वारकरी पायी चालत आहेत, अशी माहिती सोहळा प्रमुख अ‍ॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली.
पालखी विसावल्यानंतर विठ्ठल मंदिर सभागृहात ग्रामपंचायतीच्या वतीने अन्नदान करण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बारामती तालुक्यातील निंबुत गावाकडे रवाना झाला.
गुरुवारी (ता. २६) दुपारी सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण निंबुत येथील मा. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती चोपदार मनोज रणवरे यांनी दिली.
 सर एकंदरीत पुरंदर तालुक्यातील प्रवास हा अत्यंत आनंददायी होता पावसाचा रिमझिम सरी वारकऱ्यांचा उत्साह भक्तिमय वातावरण यामुळे हा प्रवास सुखाचा झाला आनंदाचा झाला आता इथून पुढचा देखील प्रवास आनंदमय होईल यात शंका नाही 

Leave a Comment

You cannot copy content of this page