

पुणे – गंगाधाम शत्रूंजय महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही नियमांना धाब्यावर बसवून या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गंगाधाम चौकात यापूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता, तर मागील वर्षीही असाच प्रकार घडून एका महिलेला जीव गमवावा लागला होता. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अलीकडेच या मार्गाची पाहणी केली. पाहणीदरम्यान, या मार्गावर सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ही बंदी धाब्यावर बसवली जात असल्याचे दिसून आले. याबाबत आयुक्तांनी प्रत्येक मुख्य चौकात हाईट बॅरियर बसविण्याचे निर्देश दिले होते. चौकांमध्ये बॅरियर बसवले गेले पण शत्रूंजय चौकातील बॅरियर पुन्हा काढण्यात आले, हे विशेष.
या महामार्गावर कार्यालय, शाळा आणि घनवस्ती असलेले अनेक परिसर असूनही सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती पावले उचलण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. यामुळे ‘अवजड वाहतुकीवर बंदी’ ही केवळ कागदावरच असल्याचे चित्र समोर येत आहे.