भीमाशंकर कारखान्यास “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार प्रदान

Photo of author

By Sandhya

दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता देशातील “वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला असून कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील व कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी स्विकारला.
नॅशनल फेडरेशन ऑफ  को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवार (दि. ३ जुलै) रोजी सन २०२३-२४ राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार” सोहळा आयोजित करून देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक व्यवहार राज्य मंत्री श्रीमती निमुबेन बांभनिया, हरियाणातील ॠषीहूड विद्यापीठाचे कुलपती व माजी केंदीय मंत्री सुरेश प्रभू, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. अरविंद कुमार शर्मा,  उत्तर प्रदेश राज्याचे ऊस विकास मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.,चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते.     
 कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री मा.ना.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. आजपर्यंत कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १६ असे एकूण २९ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे. अशी माहिती व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page