
पुणे – अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून, या अहवालावर सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
मोहोळ म्हणाले, “सध्या प्राप्त झालेला अहवाल हा केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे. अजूनही तपास सुरू आहे. AIB (एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) ने या प्रकरणात अत्यंत चांगले काम केले आहे. पूर्वी जर एखाद्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला असता, तर ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी परदेशात पाठवावा लागायचा. मात्र आता भारतातच ती सुविधा उपलब्ध झाली आहे. केवळ एका दिवसात आम्ही ब्लॅक बॉक्स शोधून काढला.”
ते पुढे म्हणाले, “AIB ही एक स्वायत्त संस्था असून ती पूर्णपणे निष्पक्षपणे तपास करत आहे. त्यांनी सादर केलेला अहवाल प्राथमिक स्वरूपाचा असून, त्यावर सध्या कोणताही ठाम निष्कर्ष देणे शक्य नाही. अंतिम अहवाल आल्यानंतरच अधिकृत विधान करता येईल.”
त्यांनी स्पष्ट केले की, “काही संभाषण आणि प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत, मात्र ते अंतिम नाहीत. त्या संदर्भात अजून तपास आणि विश्लेषण सुरू आहे.”