अपहरण झालेल्या सालगड्याला वाचवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना ऊसतोड मुकादम आणि गुंडाकडून बेदम मारहाण!

Photo of author

By Sandhya

*मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट गंभीर जखमी
*जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड दि.१२(प्रतिनिधी)- बाराशे रुपयासाठी ऊसतोड कामगाराचे मुकादमाने अपहरण केल्याची माहिती मिळताच सालगड्याला वाचवण्यासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारानीन बेदम मारहाण केल्याची घटना काल शुक्रवार दिनांक ११ रोजी माजलगाव तालुक्यातील लऊळ गावात घडली. या घटनेमध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी राजाराम सिरसट यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत अधिक माहिती अशी की माजलगाव तालुक्यातील किट्टीआडगाव येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांच्याकडे शेतात काम करण्यासाठी असणारा शेतगडी विश्वनाथ पंडित यांच्याकडे ऊसतोड मुकादम शेख राजू शेख बाबू रा. मंजरथ ता. माजलगाव जि.बीड याचे बाराशे रुपये देणे होते. या बाराशे रुपयांसाठी या मुकादमाने व त्याच्या साथीदारांनी शेतगडी विश्वनाथ पंडित यांचे शुक्रवार दिनांक 11 रोजी सकाळी दहा वाजता अपहरण केले. त्यानंतर त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी शेत मालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना फोन करून मारहाण होत असल्याची माहिती दिली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांनी संबंधित मुकादमा कडे फोनवरून शेतगड्याकडील पैशासंदर्भात विचारले असता मुकादमाने शेतगडी विश्वनाथ पंडित यांच्याकडे दीड लाख रुपये आहेत. दीड लाख रुपये द्या आणि शेतगड्याला घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे राजाराम सिरसट यांनी दीड लाख रुपये दिल्यास तुम्ही माझ्या शेतगड्याला सोडणार का? असे विचारताच त्यांनी पैसे घेऊन या त्याला सोडतो असे सांगितले. त्यानंतर राजाराम सिरसट यांनी घरी जाऊन दीड लाख रुपये घेतले व मुकादमाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. यावेळी शेत गड्याने दीड लाख रुपये
देऊ नका असे सांगितले. त्यामुळे
मुकादम शेख राजू शेख बाबू आणि त्याच्या साथीदारानी शेत गड्यासह शेत मालक सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान
लाठ्या-काठ्या, कु-हाड आणि गुप्ती अशी धारदार शस्त्रे घेऊन झाडीमध्ये लपून बसलेल्या दहा-बारा जणांनी बाहेर येत शेतगडी आणि शेतमालक राजाराम सिरसट यांना मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी मुकादमाने त्याच्या जवळ असलेल्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली असता पोलीस खात्यातील कैशल्याचा वापर करून राजाराम सिरसट यांनी शिताफिने मुकादमा जवळील रिव्हॉल्वरचा ताबा घेतला. परंतु सदर रिव्हॉल्वर मध्ये बुलेट नाहीत हे मुकादम आणि त्याच्या साथीदारांना माहित असल्यामुळे आपल्याला काही धोका नाही हे सर्वांना ज्ञात होते. त्यामुळे सर्वांनी असुरी हसत पुन्हा जबर मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट गंभीर जखमी झाले. या गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांना जबरदस्ती मोटरसायकलवर बसवून माजलगाव तालुक्यातील ढोरगाव आणि लवूळ शिवारातील घनदाट असलेल्या जंगलात घेऊन जाऊन पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी सदरील मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी राजाराम सिरसट यांच्या जवळील दीड लाख रुपये हिसकावून घेत बेदम मारहाण केली. या मारहाणी मध्ये राजाराम सिरसट यांच्या घशाला कोरड पडल्यामुळे त्यांनी मुकादम आणि मारहाण करणाऱ्यांकडे मला मारू नका, मी मरेन, मला पाणी द्या अशी विनंती करून पिण्यासाठी पाणी मागितले असता या गुंडांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. यावर हे लोक थांबले नाहीत यांनी त्यांच्या कानात नको ती कृती करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आपल्या साहेबासोबत अमानुष कृत्य करत आहेत आणि बेदम मारहाण करत आहेत हे पाहून घाबरलेला शेतगडी त्या ठिकाणाहून पळून गेले व त्यांनी राजाराम सिरसट यांच्या मुलाला फोन करून मुकादम आणि त्याचे साथीदार जबर मारहाण करत आहेत. तुम्ही ताबडतोब या असे फोन द्वारे सांगितले. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याचे समजताच राजाराम सिरसट यांचा मुलगा विजयकुमार सिरसट यांनी वडीलांना फोनवरून संपर्क साधला असता मुकादम व त्याच्या साथीदारांनी राजाराम सिरसट यांना कोणाचा फोन आहे असे म्हणत फोन उचलण्यासाठी सांगितले. त्यावेळी राजाराम सिरसट यांनी आपल्या मुलाला फोनवरून मला लऊळ गावातील सैलानी बाबा परिसरात मुकादम आणि त्याचे काही साथीदार मारहाण करत आहेत ताबडतोब ये असं निरोप दिला. आपल्या वडिलांना मारहाण होत असल्याने विजयकुमार सिरसट मित्रांना घेऊन वडिलांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. यावेळी राजाराम सिरसट यांचा मुलगा आणि त्याचे मित्र येत असल्याचे पाहून मुकादम व त्याच्या गुंडांनी गंभीर जखमी झालेल्या राजाराम सिरसट यांना पुन्हा गाडीवर बसवून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर
चिखल असल्याने मोटारसायकल चिखलात स्लिप झाली व मोटारसायकलवरील तिघे खाली पडले. त्यावेळी राजाराम सिरसट यांचा मुलगा व त्याचे मित्र घटनास्थळी येताच मारहाण करणारे गुंड पळून गेले. दरम्यान या वेळी मारहाण करणाऱ्या मुकादमाला विजयकुमार सिरसट यांच्या मित्रांनी पकडून माजलगाव पोलीस ठाण्यात आणले. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम सिरसट यांनी मारहाण करणाऱ्या मुकादम आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधात तक्रार दिली असून आज शनिवार दिनांक 12 रोजी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या मारहाणीत राजाराम सिरसट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.
किरकोळ पैशासाठी मुकादम आणि त्याच्या साथीदारांकडून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना अमानुष आणि गंभीर मारहाण होते हे बाब अतिशय गंभीर आणि अमानवी आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.


Leave a Comment

You cannot copy content of this page