
पुणे – समर्थ पोलिस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावत मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (क्र. एमएच/१२/पीआर/६३६१) के. के. मोटर्स समोरील पावर हाऊस चौक, रास्ता पेठ येथे पार्क केली होती. अज्ञात इसमाने ती चोरी केली होती. दुसऱ्या प्रकरणात इनामदार चौक, नाना पेठ येथे लॉक करून ठेवलेली बजाज चेतक इलेक्ट्रिक दुचाकी (क्र. एमएच/१२/डब्ल्यूजी/८८२२) चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
मा. वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फूटेज तपासले. तसेच गुप्त माहितीच्या आधारे दोन्ही चोरीप्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात तपास पथकाला यश आले. सुतारवाडी, पुणे येथून सागर वसंत शिंदे (वय ३०, रा. सुतारवाडी गावठाण, पुणे) याला अटक करण्यात आली. त्याने रास्ता पेठ येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
दुसरा आरोपी सुबोजित राजेंद्र दास (वय २८), सध्या रफिकभाई भंगार दुकान, राजेवाडी, भवानी पेठ येथे वास्तव्यास असून मूळचा पश्चिम बंगाल येथील आहे. त्याने इनामदार चौक येथून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले आहे.
दि. २० जुलै २०२५ रोजी दोघांनाही गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) श्री. राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०१) श्री. कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त (फरासखाना) श्रीमती अनुजा देशमाने आणि गुन्हे निरीक्षक उमेश गित्ते व चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पो.उ.नि. जालिंदर फडतरे, सपोफो पागार, औचरे, पो.अं. रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे आणि भाग्येश यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
समर्थ पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.