पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा - azadmarathi.com
    मुंबई, दि.२२ : - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स' या समाज माध्यमावर पोस्ट करत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या.  'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची विचारधारा अधिक बळकट करण्यामध्ये श्री.पवार हे मोलाचे योगदान देत आहेत. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो.' अशा  शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

त्याचप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘एक्स’ या समाज माध्यमावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कामांना गती आणि बळकटी देण्यामध्ये आपली भूमिका कौतुकास्पद आहे. तुमच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.”असे श्री.शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले, “आदरणीय पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा हा स्नेह माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत मी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.”

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या असून, सोशल मीडियावर त्यांच्या कार्याचे कौतुक करणाऱ्या पोस्ट्सचा पूर आला आहे.
0000000

Leave a Comment

You cannot copy content of this page