प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा

Photo of author

By Sandhya

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २: भविष्यात शेतीला निश्चितच चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून कृषी विभागाने लोकाभिमुख पद्धतीने कार्यरत रहावे, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून दूरदृष्य प्रणालीद्वारे ते उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कृषी आयुक्त सूरज मांढरे, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर व्यवस्थापक संजय शितोळे उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री श्री. भरणे यांनी कृषी विभागाची रचना, कृषी विद्यापीठे व त्याअंतर्गत विभाग, संशोधन केंद्रे, महाबीजसह कृषी विभागाच्या अंतर्गत महामंडळे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, वेगवेगळे विभाग आदींची संक्षिप्त माहिती घेतली. पीक विमा योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई), नमो किसान योजना आदी योजनांची माहिती त्यांनी घेतली. विभागाने सर्व योजना प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सांगितले.

यावेळी आयुक्त श्री. मांढरे यांनी माहिती दिली, ‘पी एम किसान सन्मान निधी’ योजनेचे राज्यात नोंदणीकृत १ कोटी २३ लाख ९२ हजार लाभार्थी असून २० व्या हप्त्यासाठी ९६ लाख ५१ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ९३० कोटी २३ लाख रुपये रक्कम जमा करण्यात आले आहेत. दरवर्षी तीन हप्त्यात एकूण ६ हजार रुपये जमा करण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page