अष्टविनायक महामार्गावर कवठे जवळ भीषण अपघात : वडनेर बुद्रुक वाजे कुटुंबातील तीन जणांचा करुण अंत

Photo of author

By Sandhya

शिरूर तालुक्यातेल कवठे येमाई येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी दि.१७ ला पहाटे झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर बुद्रुक ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ज्ञानेश्वर मकाजी वाजे (३८ वर्षे), शांताबाई मकाजी वाजे (६८ वर्षे) व मुलगा युवांश ज्ञानेश्वर वाजे (५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर वाजे हे आई व लहान मुलासह मुंबईहून दुध वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गावाकडे येत होते. कवठे येमाई येथील काळूबाई नगरजवळील बंटी हॉटेलजवळ मालवाहू ट्रकवर (क्र. एम एच ४२ बी ८८६६) दुध वाहतूक करणारा टँकर (क्रमांक एम एच १६ सीडी ९८१९ ) जोरदार आदळला. धडक एवढी भीषण होती की टँकर ट्रकमध्ये घुसला.आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. मात्र लहानगा युवांश जागीच ठार झाला, तर गंभीर जखमी शांताबाई व ज्ञानेश्वर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. टँकर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

या अपघातात वाजे कुटुंबातील तीन जणांचा करुण अंत झाल्याने वडनेर बुद्रुक गाव व परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. अष्टविनायक महामार्ग सततच्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा ठरत असून धोकादायक वळणांवर चेतावणी फलक व गतिरोधक उभारण्याची मागणी कवठे येमाईच्या सरपंच मनीषा पांडुरंग भोर व स्थानिकांकडून होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page