पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंदीकाकी जगताप, तर उपाध्यक्षपदी कृष्णा शेट्टी यांची बिनविरोध निवड

Photo of author

By Sandhya

सासवड: पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२५-२०३० या आगामी पाच वर्षांसाठीच्या संचालक मंडळाची नुकतीच निवड झाली आहे. सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि पतसंस्थेचे संस्थापक सहकारमहर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या पत्नी, आनंदीकाकी जगताप यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच उपाध्यक्षपदाची जबाबदारी कृष्णा शेट्टी यांना मिळाली आहे.
​बुधवारी पुणे येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालय (पुणे ग्रामीण) येथे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
​या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार समारंभ याच ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आनंदीकाकी जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक संजय पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय ससाणे, सहकारी अधिकारी सोनाली देसाई, सिद्धार्थ झांजे आदींसह पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. यामध्ये अंकुशराव जगताप, आनंदराव घोरपडे, डॉ. विनायक खाडे, राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, अनिल कामठे, चंद्रकांत बोरकर, बाबासो चौंडकर, परशुराम तांबे, अमोल सातभाई आणि सुर्यकांत कांबळे यांचा समावेश होता. पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतिश शिंदे आणि हरीभाऊ शिंदे देखील याप्रसंगी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page