पर्यटन संचालनालयाच्यावतीने “पर्यटनाचा महाकुंभ-२०२५” चे आयोजन

Photo of author

By Sandhya

पुणे, दि. २२ : महाराष्ट्र हे ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटनासाठी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. सह्याद्रीपासून कोकण किनारपट्टीपर्यंत, विदर्भाच्या वन्यजीवांपासून मराठवाड्याच्या वारशापर्यंत राज्याची पर्यटन संपदा अत्यंत वैविध्यपूर्ण आहे. यामुळेच महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक पातळीवर अधिक बळकटपणे सादर करण्याची संधी साधत महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पर्यटनाचा व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने येत्या शनिवार व रविवारी (दि. २३ व २४ ऑगस्ट) “पर्यटनाचा महाकुंभ-२०२५” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून “आपला जिल्हा, आपले पर्यटन” ही थिम आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, प्रायोजक रॉयल गोल्डफील्ड क्लब रिसॉर्ट आणि संकल्पना व ट्रॅव्हल पार्टनर स्मिता हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटनाचा महाकुंभ आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण सेंट्रल पार्क हॉटेल, जंगली महाराज रोड, डेक्कन, पुणे येथे असून कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि विशेष वैशिष्ट्यांचे दर्शन घडणारे पर्यटन स्टॉल्स लावण्यात येणार असून, सर्व जिल्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आमंत्रित केले आहे. तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचाही विशेष प्रचार यामध्ये करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी व पर्यटनप्रेमींनी या ठिकाणी अधिकाधिक संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
०००००

Leave a Comment

You cannot copy content of this page