





छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ मध्ये उभारलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या आत्म्याचे रूप आहेत. आता हे गड फक्त आपलेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे झाले आहेत. युनेस्कोने ११ जुलै २०२५ रोजी महाराजांचे महाराष्ट्रातील ११ दुर्ग आणि एक दक्षिणेतील जिंजीचा किल्ला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आणि शिवरायांचे स्वराज्य – जागतिक नकाशावर अधोरेखित झाले. या ऐतिहासिक मान्यतेमागे अनेकांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी मुख्यमंत्र्यांना साथ दिली. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्वत: जाऊन युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेतली. तेथे तांत्रिक सादरीकरण केले. मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव विकास खारगे, तसेच भारताचे युनेस्कोतील राजदूत विशाल शर्मा आणि पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे हेमंत दळवी त्यात सहभागी होते. अनेकांचे हातभार लागले आणि त्यातून देशभरातील शिवभक्तांसाठी आजचा आनंदाचा क्षण साकारला गेला. त्या निमित्ताने या बारा किल्यांचे महत्त्व अधोरेखित केलेला हा संकलित लेख आपल्यासाठी…!!
हे फक्त किल्ले नाहीत… ते आहे आपल्या अस्मितेचं जिवंत रूप! शिवरायांचे हे किल्ले म्हणजे इतिहासाचे सजीव संग्रहालय आहेत. इथल्या प्रत्येक दगडात स्वराज्याची ठिणगी साठलेली आहे. चला तर, पाहूया या बारा दुर्गांची शौर्यगाथा – प्रत्येकाची वेगळी ओळख आणि शिवरायांच्या जीवनाशी नाळ जुळलेली!
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानी किल्ला होता. इथेच १६७४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला आणि मराठा साम्राज्याची औपचारिक सुरुवात झाली. रायगड हा राजकारण, प्रशासन आणि सैन्य संचालनाचे केंद्र होता. दुर्गम, मजबूत आणि नैसर्गिक संरक्षण असलेला हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वप्नाचा प्रतिबिंब मानला जातो. रायगड म्हणजे मराठ्यांच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या गौरवाचे प्रतीक आहे. १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. महाराजांनी याला ‘राज्यगड’चं रूप दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्यावर आपला देह ठेवला. त्यांची समाधी ही मराठी माणसांच्या अपार श्रद्धेचं ठिकाण आहे. रायगड म्हणजे स्वराज्याची मूर्तिपूजा.
राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा पाया मानला जातो. याचे जुने नाव मुरुंबदेव होते. इ.स. १६४६ साली शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला जिंकून घेतला आणि यालाच आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. जवळपास २६ वर्षे हा किल्ला राजधानी राहिला. इथेच महाराजांच्या पत्नी सईबाई यांचे निधन झाले, आणि पुत्र संभाजी यांचे बालपणही याच किल्ल्यावर गेले. अफजलखान वधानंतर महाराज थेट राजगडावरच परतले होते. राजगड हा भक्कम, विशाल आणि रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता.
प्रतापगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि राजकीय चातुर्याचा जिवंत स्मारक आहे. सातारा जिल्ह्यात, महाबळेश्वरपासून जवळ असलेला हा किल्ला १६५६ साली महाराजांनी बांधला. याच किल्ल्यावर १६५९ साली अफझलखानाशी ऐतिहासिक युद्ध झाले. अफझलखानाचा पराभव हा स्वराज्यासाठी एक मोठा विजय होता. ही लढाई केवळ तलवारीची नव्हती, ती नियोजनाची, रणनीतीची आणि दृढ इच्छाशक्तीची होती. प्रतापगडावरून शिवरायांनी पहिल्यांदाच आपल्या युद्धनीतीची प्रभावी चुणूक दाखवली. यामुळेच प्रतापगड आजही “शौर्य आणि चातुर्याची रणभूमी” म्हणून ओळखला जातो. इथेच अफजलखानाच्या भेटीने इतिहास घडवला. महाराजांनी शौर्य, राजनैतिक डावपेच आणि प्रसंगावधान याचा संगम दाखवून दिला.
पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. याचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका अत्यंत थरारक घटनेमुळे अधिक वाढते – ती म्हणजे पावनखिंडीची लढाई. इ.स. १६६० मध्ये सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकलेल्या शिवाजी महाराजांनी गुप्त मार्गाने पन्हाळ्याहून विशाळगडाकडे प्रयाण केले. त्यावेळी बाजीप्रभु देशपांडे आणि काही मावळ्यांनी सिद्धीच्या सैन्याला रोखण्यासाठी घाटमाथ्यावर पावनखिंडीत प्राणांची आहुती दिली. बाजीप्रभूंची ही शौर्यगाथा इतिहासातील एक अमर पर्व ठरली. पन्हाळा किल्ल्यावर अंधारबाव, अंबरखाना, धान्यकोठी, सर्जा-राजा बुरूज यांसारखी स्थापत्यवैशिष्ट्ये आहेत. हा किल्ला काही काळ मराठ्यांच्या राजधानीसुद्धा होता.
शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. इ.स. १९ फेब्रुवारी १६३० रोजी याच गडावर जिजाबाईंनी शिवरायांना जन्म दिला. हा किल्ला निसर्गरम्य, मजबूत तटबंदीने सजलेला असून आजही त्या ऐतिहासिक जन्मकक्षाचे दर्शन घेता येते. गडावरील जिजामाता व बाल शिवरायांचा संगमरवरी पुतळा, तसेच “शिवकुंज” हा परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. शिवनेरी हे शिवरायांच्या शौर्य, संस्कार आणि स्वराज्याच्या बीजारोपणाचे प्रतीक मानले जाते.
मावळ भागातील सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेला लोहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक महत्त्वाचा संरक्षणकिल्ला होता. पुणे जिल्ह्यात लोणावळ्याजवळ स्थित असलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३,४५० फूट उंचीवर आहे. लोहगड किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांनी असलेली खोल दऱ्या आणि त्याच्या उत्तरेकडील ‘विंचूकाटा’ हे नैसर्गिक रक्षण असलेले टोक. प्राचीन काळी हा किल्ला भोर घाटामार्गे चालणाऱ्या व्यापार मार्गांचे संरक्षण करीत असे. त्यामुळेच याला “व्यापार मार्गांचा रक्षक” असे म्हटले जाते.
साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात वसलेला एक अतिशय महत्त्वाचा दुर्ग आहे. तो समुद्रसपाटीपासून सुमारे ५,२०० फूट उंचीवर असून सह्याद्रीतील सर्वांत उंच किल्ल्यांपैकी एक आहे. १६७२ साली झालेल्या साल्हेरच्या युद्धात, मराठ्यांनी मोगल सैन्याचा पराभव केला होता. हे युद्ध इतकं थोर होतं की, हजारो सैन्याच्या लढाया, घोडदळ, हत्ती, तोफा यांचा वापर झाला आणि अखेर शिवाजी महाराजांच्या सेनापतींच्या कुशल नेतृत्वाखाली मराठ्यांनी विजय मिळवला.
सिंधुदुर्ग हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्राच्या लाटांवर बांधलेला अजेय जलदुर्ग आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मालवणजवळ तो वसलेला आहे. इ.स. १६६४ मध्ये महाराजांनी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली. समुद्राच्या मध्यभागी खोल पाण्यात हा किल्ला उभारण्यात आला असून तो स्वराज्याच्या सागरी संरक्षणाचे प्रतीक आहे.
विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडजवळ, अरबी समुद्रकिनारी वसलेला एक अत्यंत भक्कम आणि ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे १० वर्षे येथे नौदल उभारणीसाठी काम केले. हा किल्ला त्यांच्या नौदल सामर्थ्याचा केंद्रबिंदू होता. शत्रूच्या जहाजांना न दिसणारी अदृश्य सागरी चढाईमार्ग ही येथील खासियत होती.
सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात, दापोली तालुक्यातील हर्णे बंदराच्या समोर सागरात वसलेला एक भव्य सागरी दुर्ग आहे. शिवाजी महाराजांनी इ.स. १६६० च्या सुमारास हा किल्ला सिध्दींच्या ताब्यातून काबीज केला आणि त्याची सागरी संरक्षण दृष्टीने पुनर्बांधणी करून मजबूत केला.
खांदेरी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण! सुमारे १६७९ साली अरबी समुद्रातील या बेटावर महाराजांनी खांदेरी किल्ल्याची उभारणी सुरू केली. याचे उद्दिष्ट मुंबई बंदरावर नजर ठेवणे आणि स्वराज्याचा सागरी संरक्षण मजबूत करणे हे होते. इंग्रज व सिद्दी विरुद्ध मराठा नौदलाच्या संघर्षात खांदेरीने निर्णायक भूमिका बजावली.
जिंजी किल्ला म्हणजेच “दक्षिणेचा जिब्राल्टर” असा ओळखला जाणारा हा किल्ला तामिळनाडूमधील विलुप्पुरम जिल्ह्यात आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज मुघलांपासून बचाव करत दक्षिणेकडे गेले, तेव्हा व्यंकोजी भोसले यांची मदत आणि पाठिंबा मिळाला. त्यांनी जिंजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात येण्यासाठी मदत केली. हा किल्ला तीन टेकड्यांवर विस्तारलेला असून त्याच्या परिसराला १३ किमीचा परिघ आहे.
या किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळाल्याने त्यांचे सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन मूल्यमापन वाढेल, जागतिक संवर्धन निधी आणि तांत्रिक मदत मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, युवा पिढीपर्यंत स्वराज्याची खरी जाणीव पोहोचेल. हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात युनेस्कोच्या अधिकारी वर्गासोबतच भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय, पुरातत्व विभाग, आणि महाराष्ट्र शासन यांचेही मोठे योगदान आहे. हे केवळ ‘वारसा’ म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय अभिमान म्हणून जपले जाईल. हा इतिहास आता आपल्या बरोबर जगाचाही असणार आहे. शिवकाल फक्त आठवणीत नको, तो अनुभवात यायला हवा… आणि आता तो अनुभवण्यासाठी जगातून लोक महाराष्ट्रात येतील!