राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

Photo of author

By Sandhya

▪️ जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ११५ उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस

पुणे, दि. ३ सप्टेंबर : (जिल्हा वृत्तसेवा)
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मेळाव्यात अनुकंपा उमेदवारांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ४४ विभागांतील एकूण १२६ रिक्त पदांवर नियुक्तीसाठी प्रतिक्षा यादीतील १६५ उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यापैकी ११५ उमेदवारांचा पसंतीक्रम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने संबंधित विभागांकडे नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. सर्व विभागीय स्तरावर कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून या उमेदवारांना १५ सप्टेंबरपर्यंत नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

या माध्यमातून जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार असून कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे.

मेळाव्यात तहसीलदार उमाकांत कडनोर, विविध विभागांचे प्रतिनिधी, तसेच अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार उपस्थित होते. यावेळी उमेदवारांना शासन निर्णय आणि अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page