दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणामुळे शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाहतूक बंद ; वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Photo of author

By Sandhya

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गांतर्गत हडपसर ते दिवेघाट या पॅकेज 6 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या कामासाठी खडकात ब्लास्टिंग करण्याची आवश्यकता असल्याने पोलिस प्रशासनाच्या देखरेखीखाली ब्लास्टिंगचे काम करण्यात येत आहे.

शुक्रवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत दिवेघाटातील वाहतूक बंद राहणार असून, दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनचालकांसाठी कात्रज-बोपदेव घाट (राज्य मार्ग क्र. 131) मार्गे सासवड, खेडशिवापूर-सासवड लिंक रोड मार्गे सासवड, कापूरहोळ-नारायणपूर (राज्य मार्ग क्र. 119) मार्गे सासवड तसेच हडपसर-उरळी कांचन-शिंदवणे घाट मार्गे (राज्य मार्ग क्र. 61) सासवड या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे.

वाहनधारकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पकाई पुणेचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
या पुढेही ज्या दिवशी असे ब्लास्टिंगचे काम असेल त्या दिवशी रस्ता बंद होईल. त्यावेळीही वाहनधारकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page