उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांत चाकण शहर हद्दीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडून कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे.
प्रशासनाने अतिक्रमणावर टाच आणल्यामुळे चाकणकर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चाकण येथे प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एकूण ५८ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, चाकण नगर परिषद व पोलीस प्रशासनामार्फत संयुक्तरित्या तळेगाव - शिक्रापूर महामार्गावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी रवी रांजणे व त्यांचे पथक, चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव व त्यांचे संपूर्ण पथक, महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळाचे पथक उपस्थित होते. दरम्यान, चाकण पोलिसांनी चाकण शहर व परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. जाधव यांच्यामार्फत देखील, रस्त्यावरील अतिक्रमण स्वतःहून निष्कासित करण्यास व त्यामागील आपापल्या अनधिकृत मालमत्ता गुंठेवारी अधिनियमात नियमित करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे
" चाकण येथे अतिक्रमणावर धाडसी कारवाई केल्यामुळे काही नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, अतिक्रमण धारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. प्रशासनाने योग्य संधी दिली नसल्याचा दावा चाकणकरांनी केला आहे. वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने ही कारवाई सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानली जात आहे."