
पुणे – नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक हे दोन्ही चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या चौकातून दररोज हजारो वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, या दोन्ही चौकात सिग्नल व्यवस्था असूनही ही यंत्रणा शोभेचा बावटा ठरत आहे. या दोन्ही चौकात सिग्नल असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाल्याने निष्पापांचे नाहक बळी जात आहेत.
वाहनचालक आणि पादचारी नियमांचे पालन करत नसल्याने हे चौक ‘ बेशिस्त चौक ‘ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. या बेशिस्तपणामुळे नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. चाकण येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा जटिल झाला आहे. दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर पडत आहे. पुणे – नाशिक महामार्गावरून पुणे बाजूकडून आणि चाकण तळेगाव या मार्गावर मुंबई आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहने मोठ्या संख्येने येतात. तर राजगुरूनगर बाजूकडून पुणे – चाकण औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या वाहनांची संख्या ही मोठी आहे. यामुळे पुणे नाशिक आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गांवरील प्रत्येक प्रमुख चौकांत सिग्नल यंत्रणा असूनही वाहतूक नियमांचे कुणीही पालन करताना दिसत नाहीत. यामुळे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कारवाई होत नसल्याने वाहनचालक बिनधास्त आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या चौकात वाहतूक पोलिसांची उपस्थिती असूनही नियम मोडणाऱ्यांवर कारवाई न झाल्याने चालक अधिक बिनधास्तपणे मोकाट वाहने दामटत आहेत. त्यामुळे नागरिकांत नाराजी असून, ” वाहतूक पोलिस केवळ दंड वसूल करण्यापुरतेच मर्यादित आहेत का?”, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. सिग्नल असूनही अनेक वाहनचालक लाल दिव्याकडे दुर्लक्ष करतात. वेगाने चौक ओलांडल्याने वाहतुकीत गोंधळ निर्माण होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
चाकणला महामार्गावर वाहतुकीची शिस्त पूर्णपणे कोलमडली आहे. यामुळे वारंवार वादावादी आणि किरकोळ अपघात होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
वाहतूक शिस्त राखण्यासाठी आंबेठाण चौक, तळेगाव चौक, माणिक चौक, आळंदी फाटा आदी मुख्य चौकात कायमस्वरूपी वाढीव वाहतूक पोलिस तैनात करण्याची गरज आहे.
” चाकण येथील चौकात सिग्नल यंत्रणांचे पालन वाहनचालक आणि पादचारी करत नाही. वाहतूक पोलीस चौकात असूनही सिग्नल कटिंग करण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना बसत आहे. नियमांचे पालन केल्यास काही प्रमाणात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.”