



आंबेगाव तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस थांबायचे नाव घेत नाही. मराठवाडा व धाराशिव जिल्ह्यात नदीकाठच्या भागात पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण गावे उध्वस्त झाली. हजारो हेक्टर जमिनी वाहून गेल्या. अनेक जनावरे मृत्युमुखी पडली. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. तशीच परिस्थिती आंबेगाव तालुक्यात होईल या भीतीने नागरिक भयभीत आहेत. आंबेगाव तालुका आणि डिंभे धरण क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घोडनदीने रौद्र रूप धारण केले असून पिंपळगाव(खडकी), कळंब, चांडोली, शिंदेवाडी एकलहरे, निरगुडसर, भराडी सह अनेक गावात नदीकाठच्या भागात दशक्रिया घाट, स्मशानभूमी परिसर, मंदिरे, बैलगाडा घाट, पाणी पुरवठा योजना, लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी पाणी शिरले आहे.
या आठवड्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून शेतजमिनींवरील बांध फुटले आहेत, परिणामी तरकारी पिके, टोमॅटो, बटाटा, बिट, काढणीला आलेले सोयाबीन, मका, जनावरांच्या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. शेतकरी बांधवांनी कांदाचाळीत साठवलेला कांदा हवेतील आद्रता आणि पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.
पावसामुळे शेतकरी बांधवांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक वाया गेली आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनींचे सपाटीकरण झाले असून, माती वाहून गेल्याने सुपीकता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी थेट घरांमध्ये घुसल्याने नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरातील वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. सचिन बांगर यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आर्थिक सहाय्य दिले जावे, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांचे पुनर्बांधणी कार्य त्वरीत हाती घ्यावे आणि शेतकऱ्यांना बियाणे व खते यासाठी विशेष आर्थिक साहाय्य मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी मा.उपसरपंच रशीद इनामदार, पोलीस पाटील बबूशा वाघ, गहिनीनाथ बिडकर यांच्यासह पिंपळगाव(खडकी) येथील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.