
हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या ग्राहकाने तंबाखू दिली नसल्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह एकाने मिळून दोन्ही ग्राहकांस शिविगाळ व दमदाटी करत एकाच्या डोक्यात फायबर काठीने जबर मारहाण केली. तुम्ही येथून निघून जा, नाही तर तुम्हांला खल्लास करून टाकतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली.
निखील हरिदास वाघमारे (वय ३५ वर्षे, रा. म्हाढा हौसिंग सोसायटी, महाळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रितेश कैलास गोरे (रा. बिरदवडी) व पप्पु लेंडघर (रा. ठेका हॉटेल, बिरदवडी, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल वाघमारे हे आपला भाऊ किशोर भानुदास वाघमारे असे दोघे ठेका हॉटेल बिरदवडीत जेवणासाठी आले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यावेळी वेटर पप्पू लेंडघर याने निखिल याच्याकडे गाय छाप तंबाखू मागितली. मी तंबाखू खात नाही, असे निखिल याने सांगितल्यावर पप्पूने चिडून तुमची गाय छाप ठेवण्याची लायकी नाही, असे म्हणाला आणि निखिल आणि किशोर यांना शिवीगाळ करु लागला. त्यावेळी हॉटेल मालक प्रितेश गोरे याने कॅश काउंटवरुन हातात फायबरची काठी घेऊन येत फिर्यादीस शिवीगाळ करून डोक्यास उजव्या बाजूस फायबरच्या काठीने मारुन जखमी केले. फिर्यादीचा भाऊ किशोर हा सोडविण्यास आला असता दोघांनी मिळून त्यालाही हाताने मारहाण करुन तुम्ही येथुन जाता का, नाही तर तुम्हांला खल्लास करुन टाकतो, अशी धमकी दिली.
चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.