
गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत ‘नाबार्ड’च्या अर्थसाहाय्यातून करण्यात येणाऱ्या जलसिंचन योजनेच्या कामांचा आणि पर्यटन धोरणांतर्गत विविध प्रकल्पांवर राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आणि प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या कामांचा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला.
मंत्रालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या आढावा बैठकीस ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हणमंत गुणाले, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता तथा सह सचिव प्रसाद नार्वेकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, राज्यात जलसिंचनाचे क्षेत्र वाढून शेतकऱ्याला मुबलक पाणी मिळण्यासाठी ‘नाबार्ड’ कडून मिळणाऱ्या निधीतून घेण्यात येणाऱ्या सिंचन प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी.
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर यामुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे गतीने करणे गरजेचे आहे. याबरोबरच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेज बंधाऱ्यात रूपांतरण करण्यासाठी आवश्यक निधीचा सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही श्री.विखे-पाटील यांनी दिले.
जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी नवीन पर्यटन धोरणानुसार जलसंपदा विभागाच्या मोठ्या प्रकल्पावर करण्यात येणाऱ्या पर्यटन विषयक कामांचाही यावेळी आढावा घेतला.