
चाकण सह चाकण एमआयडीसीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाने कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आयुक्तालयातील समावेशानंतर चाकण पोलीस ठाणे आणि महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाणे येथील पोलीस बळ वाढले आहे. चाकण औद्योगिक परिसरातील घडणाऱ्या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होत नसून रक्तरंजित हत्याकांडाने उद्योग पंढरी बदनाम होत चालली आहे.
दिवसाढवळ्या खून, गोळीबार, तुंबळ हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, तसेच तडीपार असतानाही सराईत गुन्हेगारांचा चाकण पंचक्रोशीत राजरोसपणे कोयते, पिस्तुलांसह वावर, वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकारांनी चाकण व महाळुंगे औद्योगिक भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊन सात वर्षे होत आले आहे. तरीसुद्धा गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना यश आले नसल्याची नागरिकांची भावना आहे. पिंपरी - चिंचवडसह खेड तालुक्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, यासाठी दि. १५ ऑगस्ट, २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती झाली. आयुक्तालया अंतर्गत एकूण वीस पोलीस ठाणी येतात. आळंदी, मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, महाळुंगे इंगळे एमआयडीसी, हिंजवडी, तळेगाव दाभाडे आदी औद्योगिक क्षेत्रे आयुक्तालयाच्या अख्यारित येतात.
विस्तारत्या कारखानदारीमुळे परराज्यातील कामगारांचे वास्तव्य या भागात असल्याने संमिश्र लोकसंख्या आहे. औद्योगिक वसाहतीमुळे येथील जमिनींना मोठा भाव आला आहे. त्यातून जमीन बळकावणे, ताबा घेणे असे प्रकार सर्रास होत आहेत. यासाठी गुंडांची मदत, जागा मालकांना धमक्या देणे असे प्रकार घडत आहेत. तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगारी डोळ्यांशी खेड तालुक्यातील अनेकांचे अर्थपूर्ण संबंध आहेत. आळंदी, चाकण, महाळुंगे इंगळे, तळेगाव भागात पिस्तूल कल्चर फोफावले आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलीस प्रशासनाने चाकण व परिसरात अट्टल गुन्हेगारांची धिंड काढून पोलीसी खाक्या दाखवला.
चाकण परिसरातील औद्योगिक भागात फोपावलेल्या गुन्हेगारांची समस्या सोडवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
- चाकण एमआयडीसीत बालगुन्हेगारी चिंताजनक –
” उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक भागात गेल्या काही महिन्यांच्या काळात बाल गुन्हेगारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांची सामान्य नागरिकात मोठी दहशत आहे. वाढती बाल गुन्हेगारी आणि जुवेनाईल जस्टिस कायद्याच्या मर्यादा पोलिसांची हात बांधून ठेवत आहेत. कायद्याची मर्यादा संबंधितांना माहिती असल्याने बालगुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे.”
” इझी मनी मिळविण्यासाठी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. हे भयानक वास्तव आहे. चाकण व महाळुंगे परिसरात मुलांची गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी भविष्यातील धोक्याची घंटा आहे. चाकण सह महाळुंगे परिसरात गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकारी प्रयत्न करत आहेत. गुन्हेगारांवर कडक कारवाया केल्या जात आहेत. पोलिसांच्या प्रयत्नांमुळे सध्या गुन्हेगारी कमी होत चालली आहे.” – संजय सोळंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाकण.