नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीकरिता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमाअंतर्गत 2 डिसेंबर रोजी मतदान पार होणार आहे; निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भीडपणे, सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा सज्ज आहे, सर्व नागरिकांनी व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करून शांततेत पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, लोकशाहीचा हा पवित्र उत्सवात सहभागी होऊन पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

नगरपरिषद,नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायत, अध्यक्ष पदाकरिता 76 उमेदवार आणि सदस्य पदाकरिता 955 उमेदवार यांचा समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 असून आयोगाच्या निर्देशानुसार मतदानापुर्वी मॉक पोल घेतला जाणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत.

पुणे जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व 3 नगरपंचायती मिळून एकूण 524 मतदान केंद्रे आहेत जिथे एकूण 4 लाख 51 हजार 25 मतदार ( यामध्ये पुरुष 2 लाख 27 हजार 142 तर महिला 2 लाख 23 हजार 407 व इतर 23) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात 26 नोव्हेंबर 2025 च्या अधिसूचनेद्‌वारे शासनाने 2 डिसेंबर 2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून ही सार्वजनिक सुट्टी मतदार संघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असतील त्यांना सुद्धा लागू आहे. नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालय निम्न शासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम बँका इ. ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.

जिल्ह्यात एकूण 13 ठिकाणी पिंक मतदान केंद्रे, जिथे मतदान केंद्रावरील सर्व अधिकारी कर्मचारी या महिला आहेत, व 15 ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. सर्व मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, आदी अधिकारी, कर्मचारी मिळून एकूण 3 हजार 21 कार्यरत असणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पर्याप्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच १६०८ बीयू व ८२३ सीयू प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहेत व सर्व कर्मचारी वर्ग (पोलींग पार्टी) सर्व साहित्यासहित आपआपल्या मतदान केंद्रावर पोहोचले असून 2 डिसेंबर 2025 रोजीच्या मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज आहेत.

मतदानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन लोकशाहीचा हा पवित्र उत्सव साजरा करताना सर्व मतदान अधिकारी यांनी मा. राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जबाबदारीने आपले कर्तव्ये बजाविण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधिताना सूचना दिल्या आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page