मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषदा व ३ नगरपंचायतीकरिता २ आणि २० डिसेंबर २०२५ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता राखीव कर्मचारी मिळून एकूण ९१४ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page