स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

Photo of author

By Sandhya

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट मेट्रो स्टेशन येथे राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमास नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे महानगरचे अध्यक्ष विलास लेले, जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेचे सदस्य ॲड तुषार झेंडे, सदस्या ॲड अनिता गवळी आदी उपस्थित होते.

श्री. सुधळकर ग्राहकांचे फसवणुकीपासून सरंक्षण करण्यासोबत त्यांच्या हक्काबाबत जागरुक करणे तसेच त्यांची फसवणूक झाल्यास ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेबाबत माहिती देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, याचा नागरिकांना लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सुधळकर यांनी केले.

श्री. लेले म्हणाले, ग्राहकांचे हक्क व हित अबाधित ठेवण्यासोबतच त्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यामार्फत ग्राहकांना मोफत सल्ला देण्यात येतो, असेही श्री. लेले म्हणाले.

ॲड झेंडे म्हणाले, या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी आहे. ‘ग्राहक सरंक्षण अधिनियम 2019’ हे नागरिकाभिमुख असून अधिनियमाचा व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याकरिता प्रशासनासोबतच नागरिकांनी पुढे आले पाहिजे. नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 या हेल्पलाइन क्रमांक किंवा 8800001995 या चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in संकेतस्थळद्वारे तक्रार दाखल करता येते, अधिकाधिक नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड झेंडे यांनी केले आहे.

यावेळी मान्यवरांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या विविध विभागाच्या स्टॉलला भेटी देवून सेवा व वस्तुंबाबत माहिती घेतली.

Leave a Comment

You cannot copy content of this page