

“प्रेमाला जात, धर्म, पंथ किंवा वयाचे बंधन नसते” — हे वाक्य आपण कित्येकदा ऐकतो. मात्र प्रत्यक्षात, तथाकथित मानवी समाज म्हणून विकसित झाल्याचा दावा करणाऱ्या याच युगात, भिन्न जाती-धर्मातील दोन जीवांमध्ये नैसर्गिकरित्या फुललेले प्रेम अजूनही अनेकांना सहन होत नाही. आणि त्या असहिष्णुतेतून जन्म घेतो तो क्रौर्याचा भीषण आविष्कार.
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटात दाखवलेले वास्तव हे केवळ चित्रपटापुरते मर्यादित न राहता, आज भारतीय समाजात अधिकच गडद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यात चार महिन्यांपूर्वी लखन भंडारे, मागील महिन्यात सक्षम ताटे आणि आता २२ डिसेंबर रोजी भोकर येथील जावेद पठाणची निर्घृण हत्या — ही केवळ त्याच मानसिकतेची भीषण साखळी आहे.
शांत वस्ती हादरली
भोकर शहरातील शांत, सभ्य नागरिकांची वस्ती म्हणून ओळख असलेल्या शहीद प्रफुल्ल नगर परिसरात राहणाऱ्या पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पठाण कुटुंबातील तरुण जावेद खाजा मिया पठाण याची, त्याच्या उच्चशिक्षित प्रेयसीच्या भावाने पुणे येथे २२ डिसेंबर २०२५ रोजी निर्घृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण प्रफुल्ल नगर हादरून गेले आहे.
मयत जावेदचे वडील खाजामियाँ पठाण हे सायकलवरून आईस्क्रीम-बर्फी विक्री व भंगार गोळा करून कुटुंबाची उपजीविका भागवत होते. त्यांना तीन मुले व तीन मुली अशी सहा अपत्ये. जावेद हे त्यातील सर्वात लहान. पक्षाघाताने अपंग झालेले वडील आणि आईसोबत जावेद प्रफुल्ल नगरात राहत होता. कष्ट, जबाबदाऱ्या आणि साधेपणात वाढलेला हा तरुण, कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होता.
सुमारे तीस वर्षांपूर्वी पठाण कुटुंबाचे प्रफुल्ल नगरातील भुरके कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. धर्म व चालीरीती वेगळ्या असल्या तरी, परस्पर विश्वास, सहकार्य आणि सुख-दुःखातील सहभागामुळे ही नाती इतकी घट्ट झाली होती की, जणू दोन नव्हे तर एकच कुटुंब. सण-उत्सव, कौटुंबिक कार्यक्रम, एकमेकांकडे राहणे-जेवणे हे सर्व नेहमीचेच होते.
याच जिव्हाळ्यातून, नकळत जावेद आणि भुरके कुटुंबातील तरुणीमध्ये प्रेम फुलले. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या त्या तरुणीला जावेद कधीमधी मोटारसायकलवर कॉलेजपर्यंत सोडत असे. हळूहळू दोघांचे नाते अधिक घट्ट झाले. मात्र हे प्रेमच अखेर त्याच्या मृत्यूचे कारण ठरले.
२१ डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर, जावेद ‘कामावर जातो’ असे सांगून घराबाहेर पडला. त्याने प्रेयसीसह थेट पुणे गाठले. तेथे बहिणीची ओळख असल्याने परिसर परिचित होता. दोघांनी भाड्याने खोली घेतली आणि जावेद वॉशिंग सेंटरमध्ये कामास लागला.
दरम्यान, दोघे पुण्यात गेल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांचा राग प्रचंड अनावर झाला. त्यांनी त्याच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. आणि मग त्या तरुणीचा भाऊ संदीप आणि त्याचा मित्र ओंकार पुण्यात पोहोचले. परिसराची माहिती असल्याने त्यांनी थेट जावेदच्या कामाचे ठिकाण गाठले.
क्षणात उध्वस्त झाले आयुष्य
काम आटोपून घरी परतण्याच्या तयारीत असलेल्या, बेसावध जावेदला संपविण्यासाठी दडून बसलेल्या दोघांनी थोडे बाजूला घेतलं संदीपने लोखंडी हत्याराने जावेदच्या डोक्यात सपासप वार केले. दरम्यान ही गडबड गोंधळ सुरु असताना त्याच ठिकाणी कामावर असलेल्या रौफ शेख या जावेदच्या भाऊजीने रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेला जावेद आणि एकाच्या हातात रक्ताने माखलेले हत्यार हे थरारक दृश्य पाहिले. जावेदच्या मारेकर्यांनी तोंडाला रुमाली बांधल्या होत्या. दरम्यान आपलं काम झाल्यावर निघताना अचानक संदिपच्या तोंडावर बांधलेला रुमाल गळून पडल्याने रौफ यास आरोपीची ओळख पटली.त्यामुळे त्याने “हे काय करतोस रे संदीप?” असे विचारले असता, “यात तुम्ही पडू नका” अशी धमकी देत आरोपी फरार झाले.
ससून रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
जखमी जावेदचा जीव वाचवण्यासाठी प्रथम तातडीने नजीकच्या दवाखान्यात, त्यानंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्त्रावामुळे तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. २३ डिसेंबर रोजी शवविच्छेदनानंतर २४ डिसेंबरला भोकर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आईचा हंबरडा आणि न्यायाची मागणी
नऊ महिने पोटात वाढवलेलं, जन्म दिलेलं पोर… आपल्याच अवतीभवती,आपल्याच मुलांसोबत लहानाचं मोठं झालेल्या संदीपने निर्दयीपणे संपवल्याने तिच्या काळजावर प्रचंड मोठा आघात झाला आहे. सदरील प्रकरणी शेख रौफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलीसात आरोपी विरुद्ध विविध कलमानखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून त्या दोघांनाही त्यांनी भोकर येथून ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आता पोलीस तपास करतील आणि न्यायालयीन प्रक्रियेत तो सिद्ध झाल्यास आरोपींना शिक्षा होईलही. परंतु अशा प्रकरणांमुळे मानवी समाज संवेदनहीन झालाय का? असा प्रश्न पडत आहे.
तिचा आक्रोश आजही प्रफुल्ल नगरात घुमतो आहे.
दरम्यान, आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी मयत जावेदच्या कुटुंबीयांनी केली आहे.