
महिलांच्या संघर्षाला, कष्टाला आणि त्यांच्या जिद्दीला सशक्तपणे मांडणारा आशा हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आशा सेविकांच्या आयुष्यावर, त्यांच्या दैनंदिन संघर्षांवर आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला प्रत्येक शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक आशा सेविकांना हा चित्रपट म्हणजे आपलीच कथा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या चित्रपटामुळे केवळ मनोरंजन नाही, तर समाजमन हेलावणारे अनुभवही समोर येत आहेत. असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग नुकताच एका शहरात पाहायला मिळाला. एक आशा सेविका आपल्या सासूला ‘आशा’ हा चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेली. चित्रपट पाहिल्यानंतर सासू भावुक झाली आणि तिने आपल्या सुनेच्या कामाचे मनापासून कौतुक करत, तिच्या संघर्षाची जाणीव झाल्याची भावना व्यक्त केली. हा अनुभव प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, चित्रपट समाजाशी किती घट्ट नाते जोडतो याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.
‘आशा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिपक पाटील यांनी केले असून, निर्मात्यांमध्ये कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील यांचा समावेश आहे. सहनिर्माते म्हणून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
हा चित्रपट पॅनोरमा स्टुडिओज यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून, सामाजिक जाणीव जागवणारा आणि महिलांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ देणारा सिनेअनुभव म्हणून ‘आशा’ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.