

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक हब म्हणून ओळख निर्माण करण्याकरिता प्रशासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने तयारी करीत आहे; जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा संघ, ग्रामंपचायतीने सक्रीय सहभाग घेत स्पर्धा यशस्वी करण्याकरिता एकत्रितपणे प्रयत्न करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा संघाचे सदस्य तसेच संबंधित ग्रामंपचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
श्री. डुडी म्हणाले, पुणे हे सायकलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. पुणे येथील सुमारे ५० हजारपेक्षा अधिक नागरिक दररोज सायकलच्या विविध मार्गावर अभ्यास करतात तसेच विविध सुमारे १० हजार पेक्षा अधिक सायकलपट्टू जागतिकपातळीवरील सायकल स्पर्धेत सहभागी होतात. पुणे शहराला असलेला सायकलीचा इतिहास, येथील भौगोलिक परिस्थिती, जैवविविधता, ऑलिम्पिक स्पर्धेकरिता सायकलपट्टूंना प्रोत्साहित करणे या सर्व बाबींचा संगम साधून ‘टूर द फ्रास’ या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्यात ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.
युसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला असून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जगभरात होणार आहे. संपूर्ण स्पर्धा ही चार टप्प्यांत होणार असून जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यांतून समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेची एकूण लांबी ४३७ किलोमीटर, ४० देशातील १७६ सायकलपट्टू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेबाबत सर्वत्र मोठ्याप्रमाणात उत्स्कुता आहे. त्यामुळे या स्पर्धेकरिता विद्यापिठ व महाविद्यालयांनी आपले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवावे. ग्रामीण भागातील सरंपचांनी गावातील गणेश मंडळाचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्व सांगून सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. गावपातळीवर पारंपारिक, सांस्कृतिकपद्धतीने स्वागत करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.
यावेळी विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा संघाचे प्रतिनिधी, ग्रामंपचायतीच्या सरपंचानी सूचना केल्या, त्याबाबत सकारात्मक विचार करुन कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.