ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Photo of author

By Sandhya

208 व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाच्यावतीने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उपस्थित असून, हे अभिवादन राज्यातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या आयोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी समाधान व्यक्त केले. अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी लक्षात घेऊन राज्य शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave a Comment

You cannot copy content of this page