जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडून ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गाची पाहणी

Photo of author

By Sandhya


पर्यटनस्थळे जगाच्या नकाशावर यावीत यासाठी स्पर्धेचे आयोजन- जिल्हाधिकारी

पुणे, दि. 5: जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आज ‘बजाज पुणे ग्रँड टूर- 2026’ च्या टप्पा-1 च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, मुळशी व मावळ तालुक्यातून जाणाऱ्या संपूर्ण स्पर्धा मार्गाची पाहणी केली. जिल्ह्यातील पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेली ठिकाणे जगाच्या नकाशावर यावीत; त्या माध्यमातून येथील अर्थव्यवस्थेला चालना आणि स्थानिक तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धामार्गावरील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार शंकर मांडेकर, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पिंपरी चिंचवड शहर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त विवेक पाटील, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आदी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील कुळे येथे श्रीद्धा मंगल कार्यालय तसेच मावळ तालुक्यात शांताई गार्डन येथे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, ग्राम विकास अधिकारी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आदींची बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी श्री. डूडी यावेळी म्हणाले, ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आणि ऑलिम्पिक पात्रतेची स्पर्धा असल्याने त्या दर्जाचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी सुमारे 400 कोटी रुपये मिळाले असून केवळ तीन महिन्यात 350 कि.मी. रस्ते तयार करण्यात आले आहेत. यावर्षी सुमारे 500 कि.मी. ची स्पर्धा होत असून दरवर्षी त्यात वाढ करत चार वर्षात 1 हजार 500 कि.मी. पर्यंत नेण्याचे उद्दीष्ट आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे, शिवकालीन इतिहास जगभर पोहोचविण्याची संधी आहे. मार्गाचे मोठ्या क्रीडा वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण होणार असल्याने मार्गावर स्वच्छता ठेवावी, मार्गावर पाळीव प्राणी येऊ देऊ नयेत.
ही स्पर्धा फक्त महाराष्ट्राची नव्हे तर देशाची सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे. पावणेदोनशेच्या वर स्पर्धक भाग देणार आहेत. मुळशी, मावळ, भोर, राजगड येथे स्पर्धेचा मार्ग असणार आहे. त्यामुळे येथील इतिहास पुढे येणार आहे. येथील नागरिक स्पर्धेसाठी उत्साहाने मदत करत आहेत. भारतीय आणि येथील नागरिकांचे नाव त्यांच्या कायम आठवणीत राहील असे चांगले स्वागत व आदरतिथ्य करावे. स्पर्धेवेळी येथील ग्रामस्थानी, नागरिकांनी स्पर्धेच्या मार्गावर बाजूला उभे राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा. सर्वांनी एकत्रित होऊन मोठे काम होऊ शकते हे दाखवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार श्री. मांडेकर म्हणाले, ही स्पर्धा जागतिक असून अभिमानास्पद बाब आहे. प्रशासनाने मोठ्या निधीची तरतूद केली. यामुळे येथील रस्ते खूप उत्कृष्ट झाले आहेत. येथे अनेक पर्यटन स्थळे असून सर्वांसमोर येतील. या भागाची वेगळी ओळख जगाच्या पातळीवर होईल. जगात एक चांगला संदेश जाण्यासाठी अभियान पातळीवर नागरिकांनी स्पर्धा मार्गावरील स्वच्छता ठेवावी. यासाठी जनजागृती करण्यात येईल.
पोलीस अधीक्षक श्री. गिल्ल म्हणाले, स्पर्धेच्या दिवशी मार्गावर बॅरिकेटींग करण्यात येणार आहे. स्पर्धा कालावधीत रस्ते बंद करण्यात येणार असून बंद रस्ते व त्यांना पर्यायी रस्ते याबाबतची प्रसिद्धी करण्यात येईल. नागरिकांनी स्पर्धा पाहण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी शिस्तबद्धरित्या थांबावे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवावा. पाळीव प्राणी बांधून ठेवावीत. वन्य प्राणी रस्त्यावर येतात अशी ठिकाणे प्रशासनाला कळवावीत जेणेकरूण उपाययोजना करता येतील. गावातील स्वयंसेवकांची यादी द्यावी जेणेकरून त्यांचा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहभाग घेता येईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभी माण येथील टीसीएस गेट या आरंभस्थानापासून पाहणीस सुरूवात केली. जिल्हा परिषद शाळा माण येथे जिल्हाधिकारी, आमदार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने उत्साहात घोषणा दिल्या. सायकल करंडकाचे अनावरण करण्यात आले. स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या चित्रफीत व एलईडी व्हॅनचे अनावरण करण्यात आले.
असा असेल स्पर्धेचा टप्पा-1
टीसीएस गेटसमोरुन प्रारंभ होऊन माण, अंबवडे गाव कमान, पौड, चाले, मांडगाव, कोळवण, हडशी लेक, जावण, तिकोना पेठ, काले, कडधे, थुगाव, शिवणे, डोणे, सावळे चौक, आढळे बुद्रुक, बेबडओहळ, चंदनवाडी, चांदखेड, कासारसाई नेरे, मारुंजी, लक्ष्मी चौक, भूमकर चौक, डांगे चौक, श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे डी. वाय. पाटील इंडरनॅशनल इन्स्टिट्यूट आकुर्डी येथे स्पर्धेचा शेवट होणार आहे.
यावेळी क्रीडा विभाग, मावळ व मुळशीचे गट विकास अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, विविध सायकलिंग असोसिएशनचे प्रतिनिधी, स्पर्धेच्या नियोजनाशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page