शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यासपुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

Photo of author

By Sandhya

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
०००

Leave a Comment

You cannot copy content of this page