
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
“The victory of good governance, development, and transparency”—this was the assertion made by Chief Minister Devendra Fadnavis today, January 16, 2026, following the grand success of the Mahayuti alliance in the Maharashtra Local Body (Municipal Corporation) elections.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात साज-या झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेमध्ये गेलो आणि जनतेने भाजपावर विश्वास ठेवत भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मतदारांचा आभारी आहे. हा विजय भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला समर्पित आहे अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या अपार मेहनतीचे कौतुक केले. ढोलताशांचा गजर करत, गुलाल उधळत, मिठाई वाटप करत भाजपा नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, माजी खा. डॉ. किरीट सोमय्या, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. श्रीकांत भारतीय, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ, आ. प्रसाद लाड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, जनतेला विकास हवा आहे, प्रामाणिकता हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा या निकालाने स्पष्ट केला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता म्हणून विजय शक्य झाला असेही त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास आणि उन्नती हेच ध्येय ठेवून यापुढेही कार्य केले जाईल असा शब्दही त्यांनी दिला. भाजपाच्या कार्याचा आत्मा, विचारांचा आत्मा हिंदुत्ववाद आहे आणि त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. आमचे हिंदुत्व हे संकुचित नाही तर जो कोणी भारताच्या संस्कृतीचा मान राखतो तो प्रत्येक जण हिंदू आहे असे आम्ही समजतो असेही श्री. फडणवीस यांनी अधोरेखित केले.
जनतेचे प्रेम भाजपाला लाभले आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. पुढील काळात सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निस्वार्थ भावनेने काम करायचे आहे असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले. श्री. फडणवीस यांनी यावेळी महायुतीतील सर्व मित्र पक्षांचे आभार मानले.