BJP’s strong front-line campaign in Purandar; Interviews of 108 aspirants for 12 seats completed

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भारतीय जनता पक्षाने पुरंदर तालुक्यात कंबर कसली आहे. शुक्रवारी (दि. १६) सासवड येथील भाजपा कार्यालयात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुरंदरमधील जिल्हा परिषदेचे ४ गट आणि पंचायत समितीचे ८ गण अशा एकूण १२ जागांसाठी तब्बल १०८ इच्छुकांनी आपल्या उमेदवारीचा दावा केला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मुलाखती प्रसंगी भाजपाचे नेते माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे, सरचिटणीस गंगाराम जगदाळे, शैलेश तांदळे, गिरीष जगताप, सचिन लंबाते, बाळासो गरूड, संजय निगडे, संदीप कटके, संभाजी काळाणे आणि डॉ. सुमीत काकडे, सुनिता कोलते यांसह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी, नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि आजच्या महानगरपालिकांच्या निवडणूकीतील भाजपाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच ‘जुना-नवा’ हा भेद विसरून ‘कमळ’ हाच उमेदवार मानून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
तर माजी आमदार अशोक टेकवडे यांनी मुलाखतीस आलेल्या उमेदवारांचे कौतुक करत सांगितले की, यावेळेस अनेक उच्चशिक्षित तरुण आणि महिलांनी मुलाखती दिल्या आहेत. भाजपात महिलांना मोठे स्थान असून स्वबळावर सर्व जागा जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मं
डल अध्यक्ष संदीप कटके यांनी आभार मानले.
चौकट…
विकासासाठी भाजपा हाच पर्याय: संजय जगताप
यावेळी बोलताना माजी आमदार संजय जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित देशाला योग्य दिशा देत आहेत, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तळागाळातील घटकांचा विकास सुरू आहे. पुरंदरच्या ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि प्रत्येक वाडीवस्तीपर्यंत विकासाचे दार उघडण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही.
चौकट…
विजयी रथ असाच सुरू राहील: चंद्रशेखर वढणे
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर वढणे यांनी नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या यशाचा उल्लेख करत, हाच विजयाचा रथ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही कायम राहील आणि पुरंदरच्या सर्व जागांवर भाजपा विजय मिळवेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. उमेदवारांची निवड करताना त्यांची निवडून येण्याची क्षमता, जनमत आणि सर्वेक्षण यांचा प्रामुख्याने विचार केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.