विश्रांतवाडी-धानोरी मुख्य रस्त्यावर ड्रेनेजची ‘गंगा’; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक हैराण

Photo of author

By Sandhya

Drainage ‘Ganga’ on Vishrantwadi-Dhanori main road; Citizens are shocked due to the negligence of the Municipal Corporation

विश्रांतवाडी ते धानोरी या मुख्य रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेज चेंबर फुटल्याने मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, पादचारी आणि वाहनचालकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, तक्रार करूनही पुणे महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

​अपघातांचे सत्र आणि आरोग्याचा प्रश्न

​रस्त्यावर साचलेल्या मैलायुक्त आणि घाण पाण्यामुळे दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी पडून जखमी झाले आहेत. तसेच, उघड्यावर वाहत असलेल्या मैलायुक्त पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांना या दुर्गंधीमुळे दिवसभर नाकाला रुमाल लावूनच वावरावे लागत आहे.

​प्रशासनाचे ‘तक्रारी’कडे दुर्लक्ष

​या समस्येबाबत जागरूक नागरिकांनी पुणे महानगरपालिकेकडे तक्रार क्रमांक WA231708 द्वारे रीतसर तक्रार नोंदवली आहे. मात्र, तक्रार करूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या या ढिम्म कारभारामुळे “करदात्या नागरिकांनी जगायचे कसे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

​कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

​या भागातील ड्रेनेज लाईन अत्यंत कमी व्यासाची आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता ही लाईन अपुरी पडत असल्याने ती वारंवार ‘ब्लॉक’ होते. केवळ तात्पुरती साफसफाई न करता, या ठिकाणी मोठ्या व्यासाची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
​”आम्ही वारंवार तक्रार करूनही प्रशासन ढिम्म आहे. घाण पाणी अंगावर उडत असल्याने चालायचे कुठून हा प्रश्न आहे. पालिकेने त्वरित मोठ्या व्यासाची लाईन टाकावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
— दिलीप डाळीमकर (स्थानिक नागरिक)

​आता तरी पुणे महानगरपालिका या समस्येकडे गांभीर्याने पाहून तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page