Maharashtra will stand stronger as the backbone of India’s economy

प्रजासत्ताक दिन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
भारताचे संविधान आणि लोकशाही मूल्ये यांच्या बळावरच आज भारत वेगाने प्रगती करत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात व्यक्त केला. महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावर सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील, असेही ते म्हणाले.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी, विविध देशांच्या वाणिज्य दूतावासातील प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्या वतीने या समारंभाचे आयोजन करण्यात आले.
स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण करत, संविधान निर्मितीसाठी त्यांनी व संविधान समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये भारतीय संस्कृतीत रुजलेली असून त्यांचे प्रभावी प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसून येते, असे त्यांनी सांगितले. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली बंधुतेची भावना संविधानाच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.